Wednesday, March 4, 2020

फडणवीसांची दुधारी तलवार


फडणवीसांची दुधारी तलवार




                तब्बल ५ वर्षांचा सलग मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळत असताना फडणवीसांना महाराष्ट्रापुढील अनेक प्रलंबित प्रश्नाची माहिती असूनही सोडवणूक का करता आली नाही. व सत्ता गेल्याने संतापून विधीमंडळात शाब्दिक चातुर्याचे ताशेरे उडवून आपल्याच नाकर्तेपणाचा अप्रत्यक्ष पुरावा देत आहात. चांगले वक्तृत्व कदाचित सभा जिंकू शकते. सभागृहातील आमदारांवर छापपाडू शकते. परंतु प्रत्यक्ष कामांमध्ये त्याचा उपयोग होत नाही. 

               याचा प्रत्यय हायकोर्टाने त्यांना बजावलेल्या स्पष्ट ताकदीवरून उघड होते. हायकोर्ट म्हणाले आपण मुख्यमंत्री आहात कि पक्षाध्यक्ष आहात. कारण पाचही वर्षे तुम्ही ग्रामपंचायती पासून ते लोकसभेच्या सर्व निवडणुकीमध्ये भाषणांच्या फैरी वाजवत गाजवत महाराष्ट्र पिंजून काढत होतात. प्रशासन मात्र ठप्प होते, काल नगरच्या बातमीवरून विधानसभेत घातलेला गोंधळ हा तुमच्याच कारकिर्दीतील कोपर्डीत घडलेल्या खटल्याचे काय झाले? आणि अशा कित्येक घटना आपल्या कार्यकाळात घडल्या आणि आपण मुख्यमंत्री होतात. त्याबद्दल तुम्ही का चकार शब्दही बोलला नाहीत. 



                 मी फार कार्यक्षम मंत्री होतो आणि आताचे फार अकार्यक्षम आहेत अशा ताठर भूमिकेत आपण महाराष्ट्रात काय दिवे लावणार आहेत, ते दिसतच आहे. भव्यदिव्य योजना जनतेसमोर मांडून जनतेला भूलवायचे, प्रसिद्धीचे एकही माध्यम न सोडता रोज सकाळ, संध्याकाळ, दुपार रेडीओ, टीव्ही, वर्तमानपत्र यात फोटो, योजना शुभारंभ, पायाभूत विमानतळे, मेट्रो, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग या भव्यदिव्य योजना, परदेशी भांडवल गप्पा. खिशात नाही दमडी आणि मला बाजीराव म्हणा अशी आपली कारकीर्द महाराष्ट्राला ५ वर्षे मागे घेऊन गेली.




                  पाण्याचे समान किमान पाणी वाटपाचा प्रश्न, वाहतूक कोंडी, शहरातील प्रदूषण, अनधिकृत बांधकामे, टाउन प्लानिंग, पीएमआरडीए, लिंक रोड, पुरंदरचे विमानतळ, मुंबई विमानतळ, लांबच लांब मेट्रो सगळे काही अर्धवट. रस्त्यातील खड्डे- वाजपेयी म्हणाले होते की, रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते? त्याला आता झाले २५ वर्षे ! आणि तुमचे मित्र गडकरी हे रोजच लांबच लांब रस्ते बांधत आहेत पण करायचे काय या रस्त्यांचे? इथे पुण्यात चालायला रस्ते नाहीत. पूल कोसळत आहेत, इमारती पडत आहेत. मराठा  मोर्चे, धनगर मोर्चे, शेतकरी संप हे सगळे तुमच्याच काळात घडले तसेच सीमावाद, लोकसंख्या नियंत्रण, निरनिराळे आरक्षणे, राजकीय समीकरणातील फोडाफोडी हेच उद्योग तुम्ही करत होतात. जलयुक्त शिवार हि तुमची बोगस योजना उत्तम असल्याचे भासवून पोपटराव पवारांना पद्मश्री देऊन त्या योजनांचे हसे केले.


                 आधी केले मग सांगितले, तसे का नाही केले? आणि पाच वर्षे वाया गेले. किती दुर्दैव आहे हे महाराष्ट्राच्या जनतेचे! आता काम केले पाहिजे. कारण राज्याला गरज आहे  ती उत्तरदायी नेतृत्वाची आणि कामे झटपट आणि दर्जेदारपणे उरकण्याची. त्याला हवेत टेक्नोक्रॅट किंवा मनेजमेंटचे धडे! देशाला आत गरज आहे अभियंते आणि इंजिनिअर्सची. कारण राज्यामध्ये आता संख्येला महत्त्व नाही तर कामाला जास्त महत्त्व आहे.
-    भास्करराव म्हस्के

No comments:

Post a Comment